उड्डाणपुलाखालील परिसर होणार गुलजार..!

Foto
औरंगाबाद  : सेव्हन हिल व मोंढा नाका उड्डाणपुलाखाली कचरा टाकल्या जातो, काही वेळा कचरा जाळण्याचे प्रकार घडतात. तसेच अनेक नागरिक तिथेच लघवी करतात. मोंढा नाका पुलाशेजारीच दारूचे दुकान असल्याने तळीरामांनी पुला खालील भागाला आपला अड्डा बनवले आहे. हे तळीराम तिथेच झोपत व काही भिकारी देखील याच भागात वास्तव्य करत असल्याचे चित्र दिसून येते. शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेले हे उड्डाणपुल शहराची वाहतूक समस्या सोडविण्यास मदत करतात. मात्र याच उड्डाणपुलाखाली अशी बकाल अवस्था असल्यामुळे पर्यटकांसमोर शहराची नाचक्की होत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ही अवस्था दूर होणे गरजेचे होती. यासाठी शहरातील प्रसिद्ध इंजिनिअर अवतारसिंग सोढी विशेष प्रयत्न करीत आहेत.
सोढी ऑस्ट्रेलिया येथे गेले असता तेथील ब्रिस्बेन शहरात त्यांनी उड्डाणपुलाखाली असलेले थीम पार्कस पाहिले. तसेच आपल्या शहरातील उड्डाण पूलाला देखील वैभव मिळावे या इच्छेतून त्यांनी गेल्या वर्षी त्यांनी मोंढा नाका उड्डाण पुलाखाली थीम पार्क बनवले. या कामाची मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी देखील दखल घेत समाधान व्यक्त केले. तरी देखील पुलाचा एक भाग व शहरातील इतर पुलांखाली बकाल अवस्था कायम होती. त्यामुळे सोढी यांनी आपल्या भिशीच्या ग्रुपला सोबत घेत मोंढा नाका पुलाचा उर्वरित भाग नंदनवन बनविण्याचे ठरविले. या कामात त्यांना रणजितसिंग गुलाटी, राजेंद्र वकील, हरीश अरोरा व इतर सदस्यांनी मदत केली आहे. त्याचबरोबर सेव्हन हिल उड्डाणपुलाची जबाबदारी प्रसिद्ध डॉक्टर श्री. व सौ. झिल्ला यांनी घेतली आहे. पुलांखाली साफसफाई, रंगरंगोटी, लाईट्स, बाकडे, झाडे लावून यास आकर्षक बनविण्यात येणार आहे.

या भागात झाडे लावण्यासाठी पल्लो नर्सरीचे अण्णा वैद्य यांनी विविध फायदे देणारी झाडे सुचवली आहेत. महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी दिवशी या भागात आकर्षक विद्युत रोषणाई व योगा दिन या सारखे विविध कार्यक्रम त्याठिकाणी घेण्याचा मानस या ग्रुपचा आहे. शहरातील नागरिक सुचवतील त्याप्रमाणे अधिक विविध कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करण्याची तयारी या ग्रुपची आहे. या भागात साफसफाई करण्यासाठी मनपाच्या सफाई कामगारांनी विशेष मदत केली त्या सर्व कर्मचार्‍यांचे लोढी यांनी विशेष आभार व्यक्त केले.

सांजवार्ता’ने केले होते आवाहन
पुलांच्या बकाल अवस्थेबाबत सांजवार्ताने वृत्त प्रकाशित करत. पुलाखालील भागाची जबाबदारी विविध संस्थांनी घेत त्यास वैभव प्राप्त करून देण्याचे आवाहन गेल्या आठवड्यात केले होते.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker